शाश्वत सिंचन शक्य

2016-05-05 9:00:01
     886 Views

सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी शासनाबरोबर लोकसहभागातून राज्याच्या दुष्काळी भागातील ६२०२ गावात ६ लक्ष ८८ हजार दशलक्ष पाणीसाठा निर्माण करून दहा लाख हेक्टर शेतीसाठी शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. लोकसहभागाच्या या सकारात्मक निर्माण कार्याने शेती शेतकरी व ग्रामीण क्षेत्राला भक्कम आधार दिला आहे.

संपूर्ण राज्याच्या ३/४ भागात दुष्काळ व भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लातूर सारख्या राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रसंग यावर्षी उद्भवला. पाणीटंचाई पेयजल समस्याने गंभीर स्वरूप धारण केल्याने सरकार बरोबर जनसामान्य, उद्योगपती, सेवाभावी, संस्था, पक्षोपक्षीय संघटना, यांनाही तीव्रतेची जाणीव झाली. सर्वांनी आपआपल्या पद्धतीने दुष्काळ व पाणी टंचाई दूर करण्यास हातभार लावण्यास सुरुवात केली. लोकसहभागामुळे चांगले चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले. उद्योगपती सिनेअभिनेते, सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती आज राज्याच्या निरनिराळ्या भागात दुष्काळी क्षेत्रात कामाची आखणी व विभागणी करीत आहेत. सकारात्मक दृष्टीकोण व औदार्य यामुळे जलसंधारणाची कामे आकार घेत आहेत. नद्या, नाले, ओढे, तलावाचे पुनर्जीवन करणारे हजारो हात पुढे आले आहेत. नदीकाठची सुपीक जमीन आणि पाण्याची उपलब्धता यामुळे पूर्वापार अगदी प्राचीन काळापासून नदीकाठावर वसाहती निर्माण झाल्या.

मात्र पाण्याचे नियोजन व वापर याच्या अनियंत्रित वापराने नैसर्गिक सोत्रच अवरोधित झाला. नद्या, नाले, तलाव धरणे विहरी, यातील पाणी साठे तळ गाठू लागले. सुरुवातीला याचे गांभीर्य लक्षात आले नाही. गतवर्षीच्या अवर्षणाने संपूर्ण राज्यात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली. लोकक्षोभाची तीव्रता वाढू लागली प्रशासन व सरकार यांना दैनंदिन कामकाजात विरोधीपक्ष व जनसामान्याच्या क्षोभाचा सामना करावा लागत आहे. जनता तीव्रतम पाणीटंचाईने त्रस्त आहे. ग्रामीण भागात महिलांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असताना लोकांचे हाल होत आहेत. लातूर शहराला रेल्वे द्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. राज्यात सुरु असलेली तीव्र पेयजल समस्या गंभीर स्वरूप धारण करीत असल्याने सेवाभावी संस्था नाम फाऊंडेशन, पाणी फाऊंडेशन, अभिनेते, माध्यमांनीही सहभाग नोंदवला सर्वंकष प्रयत्न सुरु केले परिणाम स्वरूप सध्या दुष्काळी भागात लोकसहभागातून बरीच कामे सुरु आहेत. नदी खोलीकरण, सरळीकरण, ओढे, नाले, नद्यांचीपात्रे खोल व रुंद होत आहेत. परिणामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार आहे. कोल्हापूर बंधारे छोटे बंधारे बांधण्यास प्राधान्य दिल्या जात असल्याने या सर्व उपक्रमातून निर्माण होणारे जलसाठे टंचाईग्रस्त भागात शेतीउत्पादन वाढीस उपयुक्त ठरणार आहेत. पाणीटंचाईची भीषणता एवढी आहे की पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागत आहे. तरीही पदरात काही पडेल याची शाश्वती नाही असा दैवीदुर्वीलास. राज्यातील भीषण पाणीटंचाईमुळे निर्माण झालेला आकांत पाण्याचे वाढते दुर्भिक्ष यामुळे लोकक्षोभ वाढू लागला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणी साठ्याने तळ गाठल्याने साखरकारखाने व दारू (बियर) कारखान्यास होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची आग्रही मागणी जोर धरत आहे. साखरकारखान्यांनी जलयुक्त शिवारासाठी मुख्यमंत्री निधीस ३२ कोटी देण्याचा मानस जाहीर केला आहे. हा सकारात्मक प्रतिसाद आहे. आज दुष्काळाचा सामना करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. या सामाजिक बदलामुळे शेती व शेतकऱ्यांचे तसेच ग्रामीण भारताचे भविष्य बदलणार आहे.

आशादायी चित्र

संपूर्ण राज्यातील दुष्काळी भागात सरकार बरोबर हातात हात घालून सेवाभावी संस्था, उद्योगपती, अभिनेते आणि प्रत्यक्ष लोकसहभागाद्वारे सुमारे २३०० कोटी रुपयाची टंचाई कामे आकार घेत आहेत. ग्रामीण भागात सहजीवनाचे आशादायी चित्र रेखाटल्या जात आहे. पाणी समस्येने होरपळणाऱ्या ग्रामीण जनतेच्या मदतीसाठी हजारो हात सक्रिय झाल्याने भविष्यकालीन पाणी समस्यांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे. कायमस्वरूपी पाणी साठे निर्माण होऊ लागल्याने पाणी समस्येचे ग्रहण सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लोकसहभाग व शासकीय प्रशासकीय यंत्रणा बरोबरीने विकास कामे करू लागल्यास डोंगराएवढे काम उभे राहू शकते हे राज्यातील सहयोगी प्रयत्नाने अधोरेखित केले आहे. आज राज्यात सुरु असलेल्या भगीरथ प्रयत्नाद्वारे राज्यातील दुष्काळग्रस्त ६२०२ गावांत १लाख ९० हजार ३३६ एकूण कामा पैकी १लाख ५३ हजार कामे पूर्ण झाली आहेत. नदी, खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, आदी कामातील शासनाने ८०७० कामे तर लोकसहभागातून ४८४६ कामे करण्यात आली राज्याच्या दुष्काळी भागातील नद्याचे १५३६ किलोमीटर रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले यातील शासकीय यंत्रणेने १७६५ किलोमीटर तर लोकसहभागाद्वारे ७८० किमी एवढे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. यामुळे सुमारे ६ लाख ८८ हजार ५९६ एवढा पाणी साठा निर्माण झाला असून त्याद्वारे १० लाख हेक्टर शेतीला कायमस्वरूपी सिंचन सोई उपलब्ध होणार आहे. या लोकसहभागाच्या कामाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. या लोकसहभागाच्या कामाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. दररोज नवीन संस्था, दानशूर व्यक्तीचे नवीन लोकसमूह यात सहभागी होत आहेत.

सुरेश खानापुरकर यांचा शिरपूर पॅटर्न, नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांचे नाम फाऊंडेशन, आमिरखान यांचे पाणी फाऊंडेशन, निसर्ग मित्रचे सुनील पोटे, परिवर्तन संस्थेचे भरत कांबळे, अक्षयकुमार, रितेश देशमुख, साखर कारखाने, उद्योगपती, दानशूर व्यक्ती या सर्वांचे अनमोल सहकार्य इतरांसाठी प्रेरक ठरत आहे पाणी टंचाई दूर करण्यासाठी समाजात सजगता निर्माण झाली हे सकारात्मक पाऊल ठरले आहे. या चळवळीतून निर्माण झालेल्या कार्याने येत्या पावसाळ्यात दुष्काळी भागाचे पाणी दुर्भिक्ष दूर होण्यास निश्चित मदत होईल.

- पुरुषोत्तम गुळवे
ज्येष्ठ पत्रकार, बुलढाणा
मो ९४२२३२५०७४
comments