३० गुंठ्यात ‘आलं’ पीक १५ लाखाचं,

2016-04-13 8:04:54
     1379 Views

बीडच्या बळिराजाची यशोगाथा
आल्याच्या पिकापासून शाश्वत उत्पन्न मिळतं. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कृष्णा पवार गेल्या चार वर्षांपासून आल्याची शेती करत आहेत. सध्या त्यांच्याकडे ३० गुंठ्यात आल्याचे पीक आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार ते आल्याचे पीक घेतात. त्यामुळे त्यांना पैसेही चांगले मिळत आहेत.

उन्हाळ्यात अनेक शेतक-यांना पाण्याची समस्या भेडसावते. पण ज्या शेतक-यांकडे उन्हाळ्यात पाणी उपलब्ध आहे. त्यांना मात्र त्याचा चांगला फायदा होतो. कृष्णा पवार हेही त्यातीलच एक. केज तालुक्यातल्या पवारवाडीचे ते रहिवासी असून त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यामध्ये ते पारंपरिक पिकांबरोबरच भाजीपाल्यांची शेती करतात.उन्हाळ्यात त्यांच्याकडे दोन एकराला पुरेल एवढं पाणी असतं. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर आणि उत्पन्नवाढीसाठी ते गेल्या चार वर्षांपासून अद्रक शेती करत आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने त्यांना उत्पादनही कमी मिळत होता. त्यामुळे गेल्या वर्षी त्यांनी सुधारीत पद्धतीनं अद्रक शेती करण्याचा निर्णय घेतला आणि मे मध्ये ३० गुंठ्यात बेडपद्धतीनं अद्रक लागवड केली.कृष्णा पवार यांनी बेडवर ५ बाय १.५ फुटावर अद्रकाची लागवड केली. ३० गुंठ्यासाठी त्यांना ३ क्विंटल बियाणं लागले. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर त्यांचा विशेष भर आहे. लागवडीपूर्वी ८ टड्ढॉली शेणखत शेतात मिसळून त्यांनी अद्रक लागवड केली. पीक एक महिन्याचे झाल्यानंतर त्यांनी डीएपी,२०,२०,२० आणि १३,४०,१३ या खताचा डोस दिला.

खत आणि पाण्यासाठी ते ठिबकचा वापर करतात. त्यांच्याकडे दोन बोअर असून रोज ते ठिबकने दोन तास पाणी देतात. बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी अकरा फवारण्या केल्या. गरजेनुसार आंतरमशागत करून त्यांनी वेळीच तण नियंत्रण केले. जानेवारीमध्ये कृष्णा पवार यांनी अद्रकाची काढणी सुरू केली. आतापर्यंत त्यांना १० गुंठ्यापासून ५.७ टन उत्पादन मिळालंय. लातूर, परभणी आणि बीडच्या बाजारात ते अद्रकाची विक्री करतात. सरासरी ७० हजार रुपये टनाने त्यांना आतापर्यंत ४ लाख रुपये उत्पन्न मिळालंय. २० गुंठ्यापासून अजून त्यांना १२ टन उत्पादन अपेक्षित आहे. दोन टन अद्रकाची त्यांनी बेण्यासाठी १ लाख रुपये टनानं विक्री केली. त्यातून त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. यंदा बाजारात अद्रक कमी आहे. त्यामुळे येत्या काळात सरासरी १ लाख रुपये टनाचा दर त्यांना अपेक्षित आहे. म्हणजेच दहा टनापासून त्यांना दहा लाख रुपये मिळणार आहेत. पूर्णं हंगामात ३० गुंठ्यापासून त्यांना १६ लाख रुपये मिळणार आहेत. १ लाखाचा उत्पादन खर्च वजा करता त्यांना १५ लाखाचं निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे.मे महिन्यात अद्रकाची लागवड केली जाते. पण याच काळात अनेक शेतक-यांना पाण्याची कमरतता भासते. त्यामुळे फारच थोडे शेतकरी अद्रक शेती करतात. हेच मार्केट ओळखून कृष्णा पवार गेली चार वर्षापासून अद्रक शेती करत आहेत. त्यापासून त्यांना पैसेही चांगले मिळत आहेत. बाजरपेठ आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यानंच हे शक्य झाल्याचं ते सांगतात.
comments