आंबा मोहोराचे संरक्षण

26-02-2016 : 12:27:06
     885 Views

आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे. प्रमुख व दुय्य्म पोषण, पाण्याची कमतरता, संजीवकांचा अभाव, योग्य पाणीव्यवस्थापन नसणे आणि किडी-रोगांचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे मोहोर आणि फलगळ होते.

तुडतुडे - या किडीची मादी कोवळ्या पानांच्या आणि मोहोराच्या पेशीमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये सुमारे २०० अंडी घालते. पूर्ण वाढलेले आणि अपूर्णावस्थेतील तुडतुडे आंब्याच्या मोहोरातील कोवळ्या फुटीमधील तसेच लहान फळांमधील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर आणि लहान फळे गळून पडतात. हे कीटक शरीरावाटे मधासारखा चिकट द्रव पदार्थ बाहेर टाकतात. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मितीच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊन वाढीवर तसेच फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. शेंडे पोखरणारी अळी : ही अळी आंब्याच्या झाडाच्या कोवळ्या फुटीवर तसेच मोहोरावर आढळते. ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीची अळी पानांच्या देठापासून कोवळ्या फांदीत शिरते. मोहोर पोखरला गेल्यामुळे तो सुकतो. मोहोर फुटण्यापूर्वीच जर अळी आत शिरली तर मोहोर फुटण्याची क्रिया थांबते. मिजमाशी - मोहोर तसेच पालवी फुटताच कोवळ्या दांड्यामध्ये अंडी घालते, दोन ते तीन दिवसांत अंडी उबवून अळी मोहोराच्या देठातील आतील भाग खाते, त्या ठिकाणी सुरुवातीस लहान गाठ आल्याप्रमाणे दिसते. प्रादुर्भित मोहोर वाकडा झालेला दिसून येतो. कोवळ्या पालवीवर प्रादुर्भाव झाल्यास पाने काळी पडून गळून जातात. भुरी - या रोगामुळे मोहोराचा देठ, फुले आणि लहान फळे यावर सूक्ष्म बुरशीची वाढ होते, त्यामुळे प्रादुर्भित भाग पांढरट, भुरकट दिसतो. रोगाचा प्रसार वा-यामुळे होतो. फुले व लहान फळे गळून पडतात आणि फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने कीडनाशक फवारणीचे वेळापत्रक तयार केले आहे. त्याची मदत घेऊन किडी-रोगनियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
comments