कलिंगड लागवडीसाठी निवडा सुधारित जाती

05-02-2016 : 06:11:40
     3581 Views

अलीकडे रबीमध्ये बागायती म्हणून कलिंगडाचे पीक घेतले जात आहे. या पिकाच्या सुधारित जाती व लागवडीविषयी अधिक माहिती घेऊ.
सुधारित जाती :
१) असाही यामाटे : ही जात जपानमधून आणण्यात आली असून, या जातीची फळे मध्यम आकाराची ७-८ किलो वजनाची असतात. फळाच्या सालीचा रंग फिकट हिरवा व गर गर्द गुलाबी रंगाचा असतो. फळे साधारणतः ९५ ते १०० दिवसांत काढणीस तयार होतात. या जातीपासून प्रतिहेक्‍टरी २५० ते ३०० क्विंटल उत्पन्न मिळते.
२) शुगर बेबी : ही जात अमेरिकेहून आणण्यात आली असून, तिची लागवड देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. फळाचा आकार लहान असून, वजन ३-५ किलोपर्यंत असते. फळांचा रंग गडद हिरवा असून, गर गर्द लाल रंगाचा, गोड व खुसखुशीत असतो. फळाच्या उत्कृष्ट चवीमुळे व मध्यम आकारामुळे ही जात महाराष्ट्रात लोकप्रिय झाली आहे. हेक्‍टरी सरासरी २५० ते ३०० क्विंटल उत्पन्न मिळते.
३) अर्का माणिक : ही जात भारतीय फलोद्यान संशोधन संस्था, बंगळूर येथे विकसित केली आहे. ही जात भुरी व केवडा या रोगांना प्रतिकारक आहे. या जातीची फळे आकाराने लांबट गोल असून, साल फिकट हिरव्या रंगाची असते. त्यावर गर्द हिरव्या रंगाचे पट्टे असतात. फळांचा रंग गर्द गुलाबी रंगाचा असून, अत्यंत गोड असतो. फळाचे सरासरी वजन ६ किलो असते.
हंगाम :
कलिंगडाची लागवड प्रामुख्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात केली जात असली, तरी कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या पिकाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुस-या पंधरवड्यामध्ये १ डिसेंबरपर्यंत केल्यास चांगले उत्पादन येते. मात्र, या कालावधीपेक्षा अधिक उशिरा पेरणी केल्यास फळमाशीचा प्रादुर्भाव वाढतो, तसेच फळे तडकण्याचे प्रमाणसुद्धा वाढते.
लागवड :
लागवडीसाठी ४ मीटर अंतरावर पाट किंवा स-या काढाव्यात. पाटाच्या दोन्ही बाजूस ९० सें.मी. अंतरावर ३० सें.मी. लांब, ३० सें.मी. रुंद, ३० सें.मी. खोल आकाराचे खड्डे करावेत. एक हेक्‍टर कलिंगडाच्या लागवडीसाठी साधारणपणे २.५ किलो बियाणे पुरेसे होते.
खते : या पिकास शेणखताशिवाय हेक्‍टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश लागते. स्फुरद व पालाश याची संपूर्ण मात्रा व नत्राची १/३ मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी.
आंतरमशागत :
- कलिंगडाच्या पिकामध्ये तणांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. तथापि, वेलाच्या बुंध्याशी व वाफ्यावर असलेले तण २-३ वेळा काढून घ्यावे.
- वेलाच्या बुंध्याजवळील माती खुरपून भुसभुशीत करावी. वेलास भर द्यावी.
- वेली पाटाच्या पाण्यापासून वाफ्यावर वाढतील याची काळजी घ्यावी.
- फळांचे वाळवी व सूर्यप्रकाशाच्या प्रखर किरणांपासून संरक्षण करण्यासाठी फळे गवताच्या किंवा भाताच्या पेंढ्यांनी झाकून घ्यावीत.
काढणी व उत्पन्न :
कलिंगडाच्या फळांची काढणी योग्यवेळी करणे आवश्‍यक असते. अपरिपक्व आणि अतिपक्व फळे काढल्यास प्रतीवर व दरावर परिणाम होतो. फळे सर्वसाधारणपणे जातीपरत्वे ९० ते १२० दिवसांत काढणीस तयार होतात.
- फळांची काढणी सकाळी करावी. त्यामुळे ताजेपणा व आकर्षकपणा टिकून राहतो. ती चवीला चांगली लागतात. कलिंगडापासून जातीपरत्वे प्रतिहेक्‍टरी २५० ते ४०० क्विंटल उत्पादन मिळते.
- डॉ. वैभवकुमार शिंदे,
comments