सुधारित पध्दतीने गाजर उत्पादन


गाजराची लागवड डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी चार ते सहा किलो बियाणे पुरेसे होते. पाभरीने पेरणी केल्यास दोन ओळींत ३० ते ४५ सें.मी. अंतर ठेवावे. नंतर विरळणी करून दोन रोपांत आठ सें.मी. अंतर ठेवावे.
गाजराच्या उत्तम वाढीसाठी १८ ते २४ अंश से. तापमान अतिशय पोषक आहे. जास्त तापमानात गाजराची वाढ खुंटते तर कमी तापमानाला लांबी वाढते. लागवडीसाठी निवडलेली जमीन मऊ आणि भुसभुशीत असावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू सहा ते सात असावा. जास्त आम्लवर्गीय जमिनीत गाजराची प्रत खालावते. लागवडीसाठी निवडलेली जमीन खोल उभी-आडवी नांगरून घ्यावी. शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत हेक्‍टरी २५ ते ३० गाड्या शेणखत चांगले मिसळून घ्यावे. पाट्याने शेतातील माती सपाट करून घ्यावी. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी चार ते सहा किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाणे २४ तास पाण्यात भिजून ठेवल्यास उगवण चांगली व कमी कालावधीत होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कॅप्टन किंवा थायरम चोळावे.यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. पाभरीने पेरणी केल्यास दोन ओळींत ३० ते ४५ सें.मी. अंतर ठेवावे. नंतर विरळणी करून दोन रोपांत आठ सें.मी. अंतर ठेवावे. बी उगवून येण्यास १२ ते १५ दिवस लागतात.
पीक व्यवस्थापन - गाजर पिकाला दर हेक्‍टरी ८० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीपूर्वी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा लागवडीनंतर २० दिवसांनी द्यावी. बियांची उगवण चांगली होण्यासाठी पेरणीपूर्वी शेत ओलावून नंतर वाफशावर बी पेरावे, लगेच हलके पाणी द्यावे. उगवण होईपर्यंत पाणी देताना पाण्याचा प्रवाह कमी ठेवावा. हंगामाप्रमाणे हिवाळ्यात सात ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. गाजर काढण्यापूर्वी १५-२० दिवस पाणी देणे बंद करावे. त्यामुळे गाजरात गोडी निर्माण होते. पाणी वारंवार दिल्यास पानांची वाढ जास्त होऊन गाजर चांगले पोसत नाहीत आणि चवीला पाणचट लागते. तंतूमुळांची वाढ जास्त होते. रोपे तीन ते चार सें.मी. उंचीची झाल्यावर विरळणी करावी. नियमितपणे खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पाल्याची वाढ मर्यादित ठेवून मुळांची वाढ जोमदार होण्यासाठी उगवणीनंतर ५० दिवसांनी ५०० पीपीएम सायकोसील संजीवक फवारावे. गाजरात मुळे तडकणे आणि कॅव्हिटी स्पॉट यांसारख्या विकृती आढळतात. त्यासाठी पिकाला नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळावा. पाणी नियंत्रित व नियमित द्यावे. जमिनीस माती परीक्षणानुसार कॅल्शिअमचा पुरवठा करावा. सुधारित वाण -
(अ) यूरोपीय जाती -
थंड हवामानात वाढणा-या या जाती द्विवर्षायू असतात. या गाजराचा रंग केशरी किंवा नारंगी असून आकाराने सारख्या जाडीचे असतात. या जातींच्या पानांची वाढ कमी असते. गाजरे खाताना कोरडी लागतात. लवकर काढणीला तयार होतात. या जातींचे बी भारतात तयार होत नाही.
१) नँटेज - या जातीचे गाजर मध्यम लांबीचे टोकापर्यंत एकसारखे, चांगल्या आकाराचे असते. आतील गाभ्याचा कठीण भाग थोडाच असतो. रंग इतर भागासारखा नारंगी असतो. पाण्याचे प्रमाण कमी असून या गाजरावर तंतूमुळे नसतात. उत्पादन चांगले येते. पेरणीपासून ७० ते १०० दिवसांत पीक तयार होते.
२) चॅटनी - या जातीचे गाजरे आकर्षक गर्द लालसर नारिंगी मध्यम लांबीची (११.५ - १५ से.मी.) आणि ३.५ से.मी. व्यासाची असतात. चव आणि गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट असून गर गोड, मुलायम असतो. ही जात कॅनिंग आणि साठवणीला चांगली आहे. हेक्‍टरी १५ टन उत्पन्न मिळते.
३) पुसा जमदग्नी - हा वाण ईसी-९९८१ आणि नँटेज यांच्या संकरातून विकसित केला आहे. गाजर १५-१६ से.मी. लांब, केशरी रंगाचे निमुळते असते. आतील भाग एकसारख्या रंगाचा नँटेजसारखा आहे. या वाणात कॅरोटीनचे प्रमाण अधिक असते. लवकर तयार होते आणि उत्पन्न जास्त येते.
याशिवाय डॅनव्हर्स, जेनो इंपेरेटर इत्यादी युरोपीय वाणांची लागवड थंड हवामानात करण्यात येते.
(ब) आशियायी जाती - या जाती उष्ण हवामानात चांगल्या येतात. या जातीचा रंग तांबडा, काळसर पिवळा असतो. गाजरे आकाराने मोठी असून आतील कठीण गाभा मोठा असतो. या जातीची गाजरे वरती जाड आणि टोकावडे निमुळते असतात. गाजरावर तंतूमुळे अधिक असतात. या जातीमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असते. मात्र ही गाजरे चवीला गोड असून जास्त रसाळ असतात. या जातीचे बी महाराष्ट्रात तयार होऊ शकते.
१) पुसा केशर - ही जात लोकल रेड आणि नँटेज या जातीच्या संकरातून विकसित करण्यात आली आहे. गाजराचा रंग आकर्षक, केशरी असून आतील भाग नरम असतो. यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक आहे. प्रतिहेक्‍टरी २५ टन इतके उत्पादन मिळते. काढणीस उशीर झाला तरी गाजरे चांगली राहतात. पेरणीनंतर ८०-९० दिवसांत तयार होते.
२) पुसा मेघाली - ही जात पुसा केशर आणि नँटेजच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. ही जात रबीसाठी चांगली असून ११०-१२० दिवसांत तयार होते. या
जातीची गाजरे आकर्षक नारंगी असून लांब असतात. या गाजरावर तंतूमुळे नसतात. यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर असते. या जातीचे उत्पादन हेक्‍टरी २५ ते २८ टन मिळते. याशिवाय सिलेक्‍शन २२३ नं. २९ हे वाण पंजाबमध्ये विकसित करण्यात आले आहे.
संपर्क - डॉ. मधुकर भालेकर
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)