हरित क्रांती...?


शेताच्या बांधांवर आंबा, चिंच, जांभूळ ; विहिरीं भोवती रामफळ, बेल, पिंपळ; ओढ्यांच्या काठांवर उंबर, गोंदण, भोकर. माळरान गायरानात आवळा, बोर, बाभूळ. एक दोन नगदी पिकं, ज्वारी, बाजरी, पिवळी यांसह तेलबिया, डाळी आणि इतर अनेक वरकड धानांनी युक्त हिरवीगार शेतं. मानव प्राणी, पाळीव प्राणी आणि निसर्गातील इतर सर्व प्राण्यांना जे जे हवं ते ते सारं उपलब्ध.
स्वप्नात वाटावं असं हे वर्णन आहे. साठ - एक वर्षां पूर्वीच्या महाराष्ट्रातील स्वयंपूर्ण खेड्यांचं. प्रत्येक शेतकर्‍यांच्या घरी किमान दहा - पंधरा प्रकारची अन्न धान्ये, कमी अधिक प्रमाणात वर्षभर उपलब्ध असायची. उतरंडीच्या डेर्‍यांत गुळ, पाक असायचा. पैसा फारसा कुणाकडे नसायचा. सारा व्यवहार धान्यांच्या देवाण घेवाणीतूनच चालायचा. नगदी पीक म्हणून पसर्‍या भूईमुग पुढे आल्यानंतर कापसाची मराठवाड्यातून पीछेहाट झाली. श्रावणी पोळ्याला चार पैसे हातात यावेत म्हणून उडीद, मुगाचे पीकही बर्‍यापैकी घेतले जायचे. भूईमुगाचे पीक एवढ़या मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे की, मजुरांच्या घरातही पोतं, दोनपोती शेंगा वर्षभर असायच्या. प्रत्येक कालवनात शेंगदाण्याचे कुट आणि जेवताना टोपलंभर भाजलेल्या शेंगा, ही मराठी पंक्तींची खासीयत.. ! अर्थात त्यावेळची !
कुटुंबाला वर्षभर पुरेल इतकी ज्वारी आणि इतर धान्य, जनावरांसाठी पेंड - कडबा आणि सार्‍या कुटुंबाला वर्षातून दोनदा नवीन कापडं घेता यावीत ही मराठी शेतकर्‍यांची माफक अपेक्षा असायची. म्हणूनच कदाचित आम्ही... आजच्यापेक्षा, त्यावेळी अधिक सुखी, समाधानी होतो. १९७२ च्या भिषण दुष्काळाने महाराष्ट्राचे होत्याचे नव्हते करुन टाकले. पश्चिमेकडून आलेल्या वार्‍यांमुळे गावं आणि शिवारंही बदलू लागली. खाण्या पिण्याच्या आणि पीक पाण्याच्या सवयी बदलू लागल्या. अधिक उत्पादन देणार्‍या संकरीत ज्वारीने पसर्‍या भूईमुग हळूहळू हद्दपार केला. प्रथमच गावरान ज्वारीच्या लागवडी खालील क्षेत्र झपाट्याने आक्रसू लागले. संकरीत ज्वारीच्या भाकरीने भूक भागायची नाही आणि तिच्या कडब्याला जनावरं तोंड लावायची नाहीत. घरी पोटभर भाकरी खाऊन शेतात जाई पर्यंत, परत भूक लागायची. गोधन - पशूधन कमी होऊ लागले. स्वत: तयार केलेले गावरान बि - बियाणे आणि शेणखतं वापरणारा बळीराजा संकरीत बि - बियाणे आणि रासायनिक खतांसाठी लाचार, परावलंबी होत गेला. एकदा संकरीत तुरीच्या बियाणाने तर कमालच केली. तुरी पुरुषभर उंच वाढल्या परंतु त्याला शेंगा आल्याच नाहीत.
गावरान तुर, अंबाडी, जवस, तीळ, वरई, भगर, करडई गायब झाले.
कपडे आणि दोरखंडही नायलॉनचेच. साखर कारखानदारी जस जशी वाढत गेली, तसतसे अफाट पाणी पिणारा ऊस हातपाय पसरु लागला. परिसराला आणि अनेक लोकांच्या तोंडाला मळीची दुर्गंधी येऊ लागली. प्रतिष्ठेच्या, मोठे पणाच्या कल्पना बदलू लागल्या.
संकरीत ज्वारी, जिला गावरान भाषेत ‘हायब्रीड’ म्हटले जायचे ; जितक्या वेगात आली तितक्याच वेगात निघून गेली परंतु ती माणसांना आणि जनावरांना अशक्त करुन गेली. त्यानंतर सोयाबीन आले. त्याच्याबरोबर अनुदानही आले. जिकडे तिकडे सोयाबीन दिसू लागले. गावरान ज्वारी - बाजरी - पिवळी आधीच गायब झाली होती. आमटी-भाकरीची जागा पोळी-भाजीने घेतली. त्यासाठी गहु - तांदुळ परप्रांतांतून येऊ लागला. दहा - पंधरा प्रकारची पिके घेणार्‍या शेतकर्‍याची शेती एकसुरी होऊ लागली. सोयाबीनचा स्थानिक पातळीवर खाद्य म्हणून उपयोग करता येत नाही. यापूर्वी घरात चार पोती ज्वारी असली की, अडी अडचणीला त्याच्या कण्या करुन खाता येत असत. ज्वारीच्या जाण्याने तो आधार गेला. जमिनीच्या आणि तिच्या लेकरांच्या आहारातील सत्व आणि विविधता कमी होत गेली. रासायनिक खतांच्या सततच्या मार्‍यांमुळे मातीची जैविक संरचना बिघडली. शेणखताच्या अभावामुळे मातीची पाणी धारण क्षमता कमी होत गेली. एकसुरी पीक पद्धतीमुळे एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं किंवा अती उत्पादन झाल्यामुळे त्याचे बाजारभाव गडगडण्याचं प्रमाण वाढलं.
साखर मुबलक पण तुरदाळ गायब, हे आजचे ज्वलंत उदाहरण आहे. यामुळे आणि बदललेल्या जीवन शैलीमुळे शेतकरी आत्महत्त्या करु लागला. मिळणार्‍या मदत, सवलतींसाठी शेतकरी आत्मसन्मान, आत्मविश्वास गमावून बसला. भाकड जनावरांबरोबरच म्हातारे आई बापही त्याला नकोसे वाटू लागले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर राजकारणाची अनिष्ट छाप पडू लागली. व्यसनं, मारामार्‍या, हेवे दावे यांनी सारा गाव पोखरुन काढला. शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं. लहरी निसर्ग आणि चतुर बाजार व्यवस्था यांच्या कात्रीत सापडलेला शेती व्यवसाय आत बट्ट्याचा व्यवहार ठरु लागला. शेतकरी काळी आई विकू लागला आणि राजकारणी, व्यापारी ती घेऊ लागले. शहरांकडे पलायन वाढलं. शेतमजूर मिळेनासे झाले. शेतकर्‍यां विषयी इतरांना आत्मियता वाटेनासी झाली. हॉटेलच्या वेटरला १०० रुपये टीप देणार्‍याला १० रुपये किलो अधिकचा कांदा महाग वाटू लागला. असो... झाडे गेली, ओढे कोरडे पडले, वन्यजीव परागंदा झाले. चिमण्यांच्या चिव चिवटा ऐवजी डॉल्बीचा दणदणाट, राजकारण्यांची काव काव आणि सार्‍यांचीच खाव खाव ! शेती भकास, शेतकरी उदास आणि इतर सारे बिनधास्त ! अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी दुसर्‍या हरित क्रांतीची हाक दिली आहे. कुणासाठी आणि कशी असेल ही दुसरी हरित क्रांती ? शेतकर्‍यांची पोरं शेतात जायला तयार नाहीत. दिवसभर पुढार्‍याच्या अवतीभवती फिरतात, ढाब्यावर जेवन करतात आणि मुक्कामाच्या गाडीने रात्री उशीरा घरी परततात. दुसरी हरित क्रांती कुणाच्या भरवशावर करणार ? कोण करणार ? भ्रष्ट नोकरशाही ? दिशाहीन शिक्षण प्रणाली ? भरकटलेली प्रसारमाध्यमे ? निद्रिस्त समाज ?... प्रत्येक नागरिकाला प्रत्येक वर्षी ठराविक कालावधीचे लष्करी आणि शेतकी प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे. बेशिस्त आणि मातीशी नाळ तोडलेला समाज कुठलीही क्रांती करु शकत नाही. हेच याक्षणी म्हणावेसे वाटेल.


---------
सुभाष मुळे,
गेवराई
९४२२२४३७८७
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)