आंबा फळगळीकडे वेळीच लक्ष द्या..

2015-02-19 20:53:43
     1436 Views

जानेवारीतील थंडीनंतर आता बहुतांश आंबा बागेमध्ये मोहोर येऊन फळधारणा झाली असेल. मात्र पुढील दोन महिन्यांत त्या फळाची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ब-याच वेळेस हवामानातील अचानक बदलामुळे फळाची गळ होते. फळगळीची नेमकी कारणे बागायतदारांना समजत नाहीत. कारण आंब्याची फळगळ होण्यामागे अनेक कारणे असतात. नेमके कारण जाणून उपाययोजना केल्यास आंब्याची फळगळ रोखता येते.
१. मोहोर कोणत्या महिन्यात आला व त्या महिन्यातील तापमानावर फळधारणा अवलंबून असते. सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमधील किंवा लवकर आलेला मोहोरामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे फळधारणा अधिक असते. याउलट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा कडाक्‍याच्या थंडीनंतर आलेल्या मोहोरामध्ये संयुक्त फुलांचे प्रमाण कमी दिसून येते.
२. आंब्याची फळधारणा झाल्यानंतर ब-याच ठिकाणी अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही. ब-याच बागेमध्ये सुरुवातीला म्हणजे जून-जुलैमध्ये खते दिली जातात. परिणामी फळवाढीच्या काळात झाडांना अन्नद्रव्याची कमतरता जाणवते. यासाठी खते दोनदा विभागून (म्हणजेच पालवी येण्यासाठी जून-जुलै आणि फळवाढीसाठी डिसेंबर-मार्च या महिन्यात) द्यावीत. यासाठी या दोन्ही अवस्थेत यूरिया (१-२ टक्के) १०० ते २०० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा गोमूत्र (१० टक्के) एक लिटर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नत्राची उपलब्धता झाल्यामुळे फळगळ रोखता येईल.
३. विशेषतः फळाच्या वाढीवेळी पाण्याचा पुरवठा झाल्यास फळगळ रोखता येणे शक्‍य आहे. यासाठी फळे वाटाणा, गोटी किंवा अंडाकृती अवस्थेत असताना झाडांच्या वाढीनुसार १० लिटर पासून १०० लिटर पाणी दिल्यास फळगळ थांबविता येते. काही वेळेस अचानक तापमानात वाढ होऊन हवेतील आद्र्रता कमी होते, त्यामुळेसुद्धा फळगळ होऊ शकते. प्रामुख्याने गेल्या १०-१५ वर्षांतील अभ्यासानुसार, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चच्या दुस-या आठवड्यापर्यंत हवेतील आद्र्रता अचानक कमी होत असल्याचे दिसून आले आहे. अशा काळात फळधारणा झालेल्या झाडांना पाण्याचा ताण बसू नये, याची काळजी आंबा बागायतदारांनी घेणे गरजेचे आहे. मोकाट पाणी दिले जात असलेल्या बागेमध्ये अचानक काही कारणांमुळे पाणी देता येत नाही. अशा वेळेस पाण्याचा ताण बसल्यामुळे प्रचंड फळगळ होऊ लागते.
४. कोकणामध्ये सद्यःस्थितीत आंबा बागेत वाटाण्यापासून अंडाकृतीची फळे दिसून येतात. मध्यंतरी असलेल्या थंडीमुळे आंब्याला मोहोर पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. फळधारणा झालेल्या फांद्याच्या बगलेतून नवीन मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. या अवस्थेत अन्नद्रव्याचा पुरवठा नवीन फळाकडे गेल्याने जुनी फळे गळून पडण्याची शक्‍यता आहे. यासाठी अशा बागेमध्ये जिबरेलिक अ‍ॅसिडची ५० ते १०० पी.पी.एम तीव्रतेची (अर्धा ते एक ग्रॅम जीए प्रति १० लिटर पाण्यात) फवारणी करावी. यामुळे पुनःपुन्हा मोहोरामुळे होणारी फळगळ रोखता येणे शक्‍य होईल.
५. सद्यःस्थितीत तापमानात वाढ होत असून, अशा वेळी तुडतुडे तसेच थ्रीप्सचा प्रादुर्भावही ब-याच भागामध्ये दिसू लागला आहे. अशा वेळेस कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशक व बुरशीनाशकांचा योग्य वापर करून किडीमुळे होणारी फळगळ थांबवणे आवश्‍यक आहे. काही शेतकरी २-३ कीटकनाशके मिसळून मोहोरावर फवारणी करतात. याचा दुष्परिणाम फळधारणेवर होतो. तसेच किडीची कीटकनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढू शकते. ब-याच वेळा मोहोर अवस्थेत असताना काही कीटकनाशकांची फवारणी केली असता परागीकरण करणारे कीटक मरून जातात अथवा फवारणी केलेल्या आंबा बागेकडे फिरकत नाहीत. पर्यायाने चांगला मोहोर येऊनसुद्धा फळधारणा नीट होत नाही. यासाठी आंबा बागायतदारांनी मोहोर अवस्थेत कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकाची योग्य त्या प्रमाणात फवारणी करणे आवश्‍यक आहे.
आंबा बागेत संजीवकांचा वापर -
आंब्याची फळगळ किंवा फळधारणा प्रक्रिया ही त्या झाडामध्ये असणा-या वाढ उत्तेजक व विरोधक यांच्या समन्वयानुसार घडत असते. व्यावसायिकदृष्ट्या आंबा लागवड करताना वाढ विरोधकाचा वापर करून झाडाची शाखीय वाढ नियंत्रित ठेवून, मोहोर आणण्याचे प्रयत्न करावे लागतात. कोकणामधील बहुतांश भागामध्ये पॅक्‍लोब्युटड्ढाझॉल या वाढनियंत्रकाचा वापर करून मोहोर लवकर आणण्याची प्रक्रिया केली जाते. आंब्याच्या वाढीच्या काळात खत-पाणी पुरवठ्याबाबत वाढ उत्तेजक संजीवकाची मात्रा देऊन पालवी आणणे, पालवी पक्व झाल्यावर वाढविरोधकाची मात्रा देऊन अन्नद्रव्याचा साठा आंब्याच्या टोकाकडे साठविणे व त्यानंतर आंब्यामध्ये बड-ब्रेकरचा वापर करून मोहोर बाहेर काढणे हे चक्र संजीवकाद्वारे सुरळीतपणे वापरून दरवर्षी हमखास उत्पादन शक्‍य होऊ शकते.
- हवामानानुसार नैसर्गिकरीत्या ही क्रिया झाडांच्या अंतर्गत चालूच असते; परंतु अचानक होणा-या हवामानबदलामुळे इच्छित वेळी आंबा उत्पादन घेता येत नाही. त्यासाठी झाडाच्या अवस्थेनुसार संजीवकाचा सुयोग्य वापर केल्यास फळगळ थांबविता येणे, फळांचे आकारमान वाढविणे या गोष्टी शक्‍य होऊ शकतात. मात्र यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन संजीवकाची फवारणी करावी. अन्यथा संजीवकाच्या प्रमाणात थोडीशी चूक झाली तरी विपरीत परिणाम होऊन आंबा बागायतदारांचे नुकसान होऊ शकते.
आंब्यामध्ये फुले आणि फळे यांची गळ प्रामुख्याने झाडामध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणा-या अ‍ॅबसेसिक अ‍ॅसिड या वाढविरोधकामुळेच होते. ज्या वेळेस प्रचंड प्रमाणात फुले किंवा फळे निर्माण झाली व झाडास आणि झाडामध्ये अन्नद्रव्याचा साठा अपुरा असल्यास नैसर्गिकरीत्या अ‍ॅबसेसिक अ‍ॅसिड तयार होऊन फुले व फळाची गळ केली जाते किंवा अचानक तापमानात बदल झाल्यास, झाडाला कोणत्याही प्रकारचा ताण बसल्यास वरील प्रक्रियेद्वारा पाने, फुले आणि फळे यांची गळ केली जाते. अशा वेळेस पाने, फुले किंवा फळे यांच्या देठापाशी कमकुवत पेशीची निर्मिती होऊन अ‍ॅबसेसिक पेशींची साखळी देठापाशी तयार होते आणि जराशा धक्‍क्‍याने पाने, फुले किंवा फळांची गळ होते. सायटोकायनीन आणि जिबरेलीन हे संयुक्तपणे दिले असल्यास अ‍ॅबसेसिक अ‍ॅसिडची निर्मिती रोखणे शक्‍य असल्याचे अभ्यासाअंती शास्त्रज्ञांना आढळले आहे. सायटोकायनीन या गटातील सीपीपीयू या संजीवकाची मोहोर अवस्थेत फळे वाटाणा व गोटी आकारात असताना २ ते ३ मि.लि. प्रति लिटर फवारणी करावी. मोहोराच्या व कळी येण्याच्या
अवस्थेत एक मि.लि. प्रति लिटर प्रमाणात फवारावे. याचा अ‍ॅबसेसिक पेशींची साखळी तयार होण्यास प्रतिबंध होऊन फळधारणेमध्ये लक्षणीय वाढ आढळून आली आहे. तसेच फळाचे आकारमान वाढून उत्पन्नात वाढ होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत ३ जिल्ह्यांमध्ये गेली ३ वर्षे चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात सीपीपीयू फवारलेल्या झाडावर फळांची संख्या न फवारलेल्या झाडापेक्षा अधिक आढळून आलेली आहे. आंतरराष्ट्रीय उद्यान परिषद, ब्रिस्बेन, ऑस्टड्ढेलिया येथे २०१४ मध्ये याबाबत शोधनिबंधही विद्यापीठामार्फत सादर केला गेला होता. आपल्या फळबागेतील झाडांची अवस्था, हवामानातील बदल याबाबत सारासार विचार करून उपाययोजना केल्यास आंब्याची फळगळ रोखून अधिक आंबा उत्पादन घेता येईल.
संपर्क - डॉ. पुजारी
काढणीपश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, किल्ला-रोहा, जि. रायगड
comments