कृषि विमा योजनेचा आधार

19-02-2015 : 08:55:13
     2310 Views

नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे. शेतकऱ्याला उच्च प्रतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीची सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. हया उद्दिष्टांची राष्ट्रीय कृषि विमा योजना शेतकऱ्यांना मोठा आधार देत आहे. या योजनेविषयीची ही सविस्तर माहिती.

सन १९८५ पासुन केंद्र पुरस्कृत सर्वंकष पिक विमा योजना भारतीय साधारण विमा निगमच्या (जी.आय.सी) सहकार्याने राबविण्यात येत होती. या योजनेत काही त्रुटी व योजनेच्या काही मर्यादा असल्यामुळे योजना अधिक व्यापक करण्यासाठी निरनिराळया स्तरावरुन आलेल्या योजना रद्द करुन राष्ट्रीय कृषी विमा योजना या नावाची नवीन योजना देशात राबवण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने सुरु केलेली राष्ट्रीय कृषि विमा योजना रब्बी हंगाम १९९९ पासुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व राष्ट्रीय कृषी विमा कंपनीच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गतसालाप्रमाणे खरीप हंगाम २०१४ मध्येही ही योजना राबविण्यात येत आहे.
नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे. शेतकऱ्याला उच्च प्रतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीची सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
योजनेची मुख्य वैशिष्टै
राष्ट्रीय कृषि विमा योजने अंतर्गत अन्नधान्य पिके (कडधान्ये, तृणधान्य) तेलबिया तसेच कापूस व ऊस पिकांना अन्य नगदी /फळबाग पिके यांना विमा संरक्षण मिळते. ही योजना महाराष्ट्र राज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसुचीत केलेल्या महसूल मंडळ किंवा तालुका पातळीवरील अधिसुचीत पिकांसाठी राबविण्याचे निश्चित केले आहे. अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह कर्जदार, बिगर कर्जदार सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्त संस्थाकडून पिक कर्ज घेतात अशा कर्जदार शेतकऱ्यांना योजना सक्तीची असते व इतर शेतकऱ्यांना ऐच्छिक असते.
राष्ट्रीय कृषि विमा योजनेत पिकांच्या उबंरठा उत्पन्नाच्या किमान आधारभुत किंमतीच्या दराने एकूण किंमतीएवढया रक्कमेस विमा संरक्षण असेल. कर्जदार शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या पिक कर्जाइतका किमान विमा उतरवावा लागेल. शेतकऱ्यांना उंबरठा उत्पन्नापेक्षा अधिक रक्कमेस विमा संरक्षण हवे असेल तर,पिकाच्या उबंरठा उत्पन्नापासून सरासरी उत्पन्नाच्या १५० टक्के पर्यंत विमा संरक्षण वाढवता येईल. व अशा वाढीव संरक्षित रक्कमेवर गणितशास्त्रावर आधारित वास्तवदर्शी विमा दर लागु राहील.
विमा संरक्षणाच्या बाबी
राष्ट्रीय कृषि विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यास टाळता न येण्याजोग्या कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल. नैसर्गिक आग, विज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, तुफान, पुर, भुस्खलन, दुष्काळ, किड व रोग इत्यादी कारणांसाठी होणाऱ्या नुकसानीचे विमासंरक्षण मिळणार आहे. मात्र युध्द आणि अणुयुध्दाचे दुष्परिणाम, हेतुपुरस्सर केलेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळणार नाही
राष्ट्रीय कषी विमा योजना ही १९९९-२००० पासून सुरु असून या योजनेत सन २०११- २०१२ पर्यंत शेतकऱ्यांनी साधारणत: ७२६.३० कोटी रुपये विमा हप्ता भरला आणि या कालावधीत ८८.५१ लाख शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी १९२४.३७ कोटी रुपये रक्कमेची नुकसान भरपाई मिळाली. विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादकतेत घट आल्यामुळे या योजनेतून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळालेली आहे. खरीप २०११ च्या हंगामात देखील ३९.१९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई १.६३ लाख शेतकऱ्यांना मिळालेली आहे. त्यामुळे चालू वर्षासाठी पिकनिहाय दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी अतिशय उपयुक्त व दिलासा देणा-या या विमा योजनेचा विमा हप्ता भरण्याची गरज आहे.
विमाहप्ता व सबसिडी
योजनेसाठी किफायतशीर विमा हप्ता ठेवण्यात आलेला आहे. राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांना विमा हप्त्यात १० टक्के सबसिडी देण्यात येते. पिकनिहाय सर्वसाधारण विमासंरक्षण प्रति हेक्टर विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे आहेत. ज्वारी, बाजरी व अन्नधान्य पिके-२.५ टक्के, तेलबीया-३.५ टक्के, कापूस-१३ टक्के, ऊस सुरू-८ टक्के, ऊस खोडवा- ८.५० टक्के, ऊस आडसाली -८ आणि ऊस पूर्वहंगामी-७.५ टक्के विमा हप्त्याचा दर ठेवण्यात आला आहे. पिककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी त्यांच्या पिकांचा विमा केल्याची बँकेत खात्री करावी. विमा हप्ता रक्कम ही कर्जाबरोबर अतिरिक्त मंजूर केली जाते. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव पत्रक भरुन रोख विमा हप्त्यासह अंतिम मुदतीपूर्वी जवळच्या बँक शाखेत जमा करावे.
पिकनिहाय अंतिम मुदत
राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी खरीप हंगामाची अंतिम मुदत असते. भात, खरीप ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद, कारळे, भुईमुग, तीळ, सोयाबीन, सुर्यफुल व कापूस या पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत पिक पेरणीपासून १ महिना किंवा ३१ जुलै २०१४ यापैकी जी आधी असेल ती अंतिम मुदत राहील. आडसाली ऊसासाठी लागवडीपासून १ महिना किंवा ३० सप्टेंबर २०१४ यापैकी जी आधी असेल ती, पूर्वहंगामी ऊसासाठी लागवडीपासून १ महिना किंवा १ डिसेंबर २०१४ यापैकी जी आधी असेल ती, सुरु ऊसासाठी लागवडीसाठी १ महिना किंवा ३१ मार्च २०१५ यापैकी आधी असेल ती तर खोडवा ऊस लागवडीपासून १ महिना किंवा ३१ मे २०१५ यापैकी जी आधी असेल ती अंतिम मुदत राहील.
उत्पन्नावर आधारित भरपाई
या योजनेतुन नुकसान भरपाई निश्चित करताना पैसेवारी, दुष्काळ, टंचाई परिस्थिती वा पुरामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात कोणत्याही शासकीय विभागाने घोषित केलेली आकडेवारी गृहीत धरण्यात येणार नाही. यासाठी कृषी आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या पिक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेण्यात येणाऱ्या पिक सर्वेक्षण अंदाजाच्या पिक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार आहे. पूर, चक्रीवादळ, भूसख्खलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी ज्या बँकेमार्फत भाग घेतला आहे त्यांना किंवा भारतीय कृषी विमा कंपनीला नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसुचित पिकांची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनी महसूल किंवा कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाईचे प्रमाण निश्चित करील.
पिकनिहाय संरक्षित रक्कम व त्याचा प्रति हेक्टर विमा हप्ता रक्कम याबाबत सविस्तर माहितीसाठी जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. अंतिम मुदतीची वाट न पाहता पेरणी होताच बीड जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱी पिक विमा योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे.

- अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी,बीड




comments