ऊस एक जिव्हाळ्याचे पीक


ऊस आपले बागायती क्षेत्रातील महत्त्वाचे पिक आहे. गेल्या दोन वर्षांचा अनुभव पाहता या पुढील दोन ते तीन वर्षांपर्यंत चांगले भाव या पिकास मिळतील असा अंदाज आहे. हे जरी खरे असले तरी, आताची आपली उत्पादकता, लागवड ते काढणी पर्यंत होत असलेला खर्च यांचा कोठेही ताळमेळ बसतांना दिसत नाही. लागवड करतांना आपण कोणतीही पूर्व तयारी न करता लागवड करतो. मुळात ऊसाचे पिक हे कमीत कमी बारा महिने आपल्या शेतात राहणारे आहे याचा लागवडीच्यावेळी जणू विसरच पडलेला असतो. ऊसाची लागवड करतांना बेणे निवडीपासून ते पाणी व्यवस्थापन व इतर बाबी पहाव्या लागतात याचे भान आपण सुरूवातीलाच ठेवले तर ऊसाचे पिक भरपूर उत्पादन देवून जाते.
ऊस लागवड करण्याचे दिवस आता जवळ आलेले आहेत. या वर्षी पडत असलेल्या चांगल्या पावसामुळे ब-याच शेतकरी मित्रांनी आपल्या शेतात सोयाबीन सारखे पीक घेतले आहे. जेणे करून सोयाबीनच्या बेवडीवर ऊसाची लागवड करणे सोईचे जाईल हा या मागचा आपला उद्देश आहे. सोयाबीन, मुग, उडीद व इतर कडधान्य पीकांची बेवड ही ऊसासाठी अतीउत्तम आहे. जेथे लागवड करतांना पावसाळा असतो किंवा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतो. अशा वेळी आपण कोणतेही सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत या पिकास टाकू शकत नाही. किंवा जे टाकले जाते ते अर्धवट कुजलेले असते. अशावेळी आपल्या बेवड पिकांमुळे काही प्रमाणात का होईना सेंद्रिय पदार्थांची तूट भरून काढण्यास मदत मिळते. त्यामुळे ऊस लागवडीपूर्वी कोणते पीक आपल्या शेतात होते किंवा शेत कोरे (पड) ठेवले होते यावर ऊस पिकाची उगवण व वाढ मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.

या हंगामात ऊस लागवड तर करायचीय परंतु शास्त्रीय दृष्टीकोणातून, हा विचार मनात ठेवून जर लागवड केली तर आपणास यश आवश्य मिळेल. आज-काल शेतीमध्ये गेल्यानंतर कोणताही शेतकरी सकारात्मकतेने पिकाकडे पाहात नसल्याचे दिसून येते. मग ते पिक कापसाचे असो की बाजरीचे. मग आपल्या पिकावर देखील नकारात्मक परिणाम भविष्यात पहावयास मिळतात. याचे चांगले उदाहरण द्यावयाचे झाल्यास कापसाच्या शेतात आपण गेल्यानंतर कोठे एखादे पाते गळालेले दिसले की आपण सरकीचे (कपाशीचे) काही खरं नाही असे म्हणतो. तेही तेथे जेथे कपाशीचे पिक उभे आहे. दुसरे दिवशी त्याच झाडाजवळ आपण जावून पाहिले तर तेथे २-४ जास्त पाते गळून पडलेले पहावयास मिळतात. याचे कारण ते झाड म्हणते माझे खरे नाही तर तुझेही काही खरे नाही. ही मानसीकता ब-याचदा आपल्या सर्व पिकांच्या बाबतीत झालेली असते. त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोणातून शेतीकडे पहावयास शिकले पाहिजे. हे करत असतांनाच खरेच काय झालेय हेही तपासले पाहिजे.
उगाच काही गोष्टी कारण नसतांना आपण करतो. आता हेच पहाना, ऊसाची लागवड करतांना फक्त सरी पाडणे व पे-या दाबणे या व्यतिरिक्त आपण काय करतो. मग त्यानंतर मात्र गोण्यानी खते देवूनही पिक समाधानकारक येत नाही. आपला खोडवा तर अत्यंत कमी उत्पादन देतो. कारण तेथे जेवढी झाडांची संख्या पाहिजे त्याकडे लागणीच्या ऊसामध्ये आपण लक्ष दिलेले नसते. एवढेच नाही तर ऊस तुटून जाण्यापूर्वी खोडवा ऊसामध्ये तुट लावण्यासाठी ब-याचदा मोकळ्या जागेत टिपरे दाबणे एवढेच आपण करतो आणि मग तुट लावली होती तरीही उत्पादनात काहीही फरक पडला नाही असे आपण म्हणतो. परंतु तुटून जाणा-या ऊसाचे वय हे एक वर्षाचे असते व त्याला मुळ्यांचे जाळे म्हणजेच तयार अन्न त्याला मिळत असते. तुटीच्या ठिकाणी फक्त ऊसाचे टिपरू लावल्यास त्याला मुळे येण्यासच साधारण २१ दिवस लागतात. त्यानंतर ते अन्न घेण्यास सुरूवात करणार आहे हे आपण विसरून जातो. मग अशावेळी तुटलेला ऊस जोमात वाढतो व तुटीचा ऊस खुरटल्या जातो. कोणाच्या तरी सावलीत वाढ होतांना स्पर्धा मोठ्याशी करतोय हे आपण विसरून जातो. मग अशावेळी ही झाडे खुरटलेली राहतात आणि विविध रोग-कीडींना बळी पडतात.
यासाठीच शास्त्रीय दृष्टीकोणातून नवीन ऊसाची लागवड आणि खोडवा व्यवस्थापन या विषयावर आपण अभ्यास करणार आहोत.

Rameshwar R. Chandak
comments
Leave a reply

आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Your E-mail ID not be published. Required *. मराठी/इंग्रजी साठी [CTRL + G] बटन वापरा

anti spam
(Maximum characters: 500)
characters left.

Required fields are marked (*)