शेतीचे नियोजन करण्याची गरज

19-02-2015 : 08:34:14
     1188 Views

आपण सर्वजण ज्याची डोळ्यात प्राण आणून वाट पहात आहोत तो आपला जीवनदाता पाऊस दमदारपणे सुरू झाला आहे. मेच्या शेवटच्या पंधरवड्यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये मोसमी पावसाचे आगमन वेळेवर होईल असे म्हटले होतेच. पण हा अंदाज वर्तविणार्या तज्ञांनाही पावसाने थोडीशी हुलकावणी दिली. तेवढ्या पुरती अनिश्चिततेची जाणीव झालीही होती. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे आगमन होणार अशी चिन्हे दिसायला लागली आणि आता गेल्या आठवडाभरात महाराष्ट्राच्या सर्व भागात कमी अधिक प्रमाणात का होईना पण पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसावर खरीप पिकांची पेरणी होईल याची काही शाश्वती आता देता येत नाही. किंबहुना काही शेतकर्यांना याच पावसावर पेरणी करण्याचा मोह होत असेल तर त्यांनी ती करू नये असा सल्ला कृषी खात्याने दिलेला आहे. अगदी नेमक्या भाषेत सांगायचे झाले तर हा मोसमी पाऊस नसून मोसमपूर्व म्हणजेच मान्सूनपूर्व पाऊस आहे. या पावसामुळे निर्माण झालेल्या ओलीवर शेतकर्यांनी ङ्गार तर खरीप पेरणीपूर्वीची मशागतीची कामे करायला हरकत नाही. मोसमी वार्याचा पाऊस पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे. तेव्हा याच पावसावर पेरणी करण्याची घाई केल्यास काहीसा घोटाळा होण्याची शक्यता आहे.

सुरूवातीला बरा पाऊस पडलेला दिसेल आणि नंतर पाऊस मोठी उघडीप देण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकर्यांनी हा सल्ला मानून खरिपाच्या पिकांची घाई करू नये. गेल्या तीन चार वर्षात तरी पेरण्यांचे असे वेळापत्रक चुकल्याचे लक्षात आलेले आहे. आता पाऊस पडत असला तरी तो काहीसा अनिश्चित राहू शकेल. याची कल्पना करून त्याला आपण कसे तोंड देणार आहोत याचीही तयारी करण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे आपण परंपरागत पध्दतीने शेती करत आहोत. खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामात पिकांची वाटणी करत आलो आहोत. ज्या कोण्या काळामध्ये अशी वाटणी करण्याची प्रथा पडली त्या काळात पाऊस चांगला आणि नियमित पडत असेलही पण आता पावसाची लहर फिरली आहे. तो बिनभरवशाचा झाला आहे. विशेषतः गेल्या २० वर्षांमध्ये एकाच वेळी भरपूर वर्षाव करणे हे पावसाचे तंत्र राहिलेले आहे. तज्ञांनी तसे अनुभवलेले आहे. त्यामुळे पावसाचे तंत्र बदलले असेल तर आपल्याला शेतीचे तंत्रही बदलावे लागेल. शेतकर्यांनी तसे ते बदललेलेही आहे. त्यांनी त्यासाठी ङ्गार मोठा अभ्यास केलेला नाही. परंतु शेतकरी आपले तंत्र अनुभवाने बदलत असतात.

खरीप किंवा रब्बी अशी पिकांची वाटणी करण्यापेक्षा खरिपातच पण उशिरा घेता येतील अशी पिके घेण्याकडे शेतकर्यांचा आता कल दिसत आहे. हा बदललेला कल त्याच्या अनुभवाच्या शास्त्राने निर्माण झाला आहे. पूर्वीच्या काळी भूईमुगाचे पीक मराठवाड्यात खरीप हंगामात घेतले जात असे. शेतकर्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर भूईमुगाचे पीक यशस्वीरित्या यायचे झाले तर पावसाळ्यातल्या सगळ्या नक्षत्रात पाऊस पडायला पाहिजे. परंतु तसा तो पडत नाही असा अनुभव यायला लागल्यावर शेतकर्यांनी भूईमुगाला सुट्टी दिली त्याच्या ऐवजी संकरित ज्वारीचा प्रयोग केला. त्यानंतर सूर्यङ्गुलाचा प्रयोग केला. परंतु या दोन्ही पिकांमुळे पैसा चांगला मिळत नाही असा अनुभव यायला लागला. त्यामुळे शेतकरी पर्याय शोधायला लागले आणि त्यांना आता सोयाबीन आणि कापूस हे दोन चांगले पर्याय मिळाले आहेत.

पावसाने लांबण लावली की शेतकरी खरीप हंगाम गेला म्हणून हातपाय गाळून बसतात. तेव्हा त्यांनी थोडा परंपरागत विचार बाजूला ठेवून हा विचार मनातून काढून टाकला पाहिजे. दुष्काळ पडला म्हणून काहीच न पेरण्यापेक्षा असे मध्य हंगामी पीक घ्यायला काही हरकत नाही. त्याचा उतारा थोडा कमी पडेल पण दुष्काळ पडला म्हणून रान मोकळे ठेवण्यापेक्षा असे पीक घेणे कधीही योग्यच ठरेल. आहे. सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांचे मार्केट जागतिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांना मागणीही चांगली असते. एकंदरीत जगाचा विचार करून शेतकर्यांनी आपल्या शेतीचे नियोजन करण्याची गरज आहे. पावसाला सुरूवात तर छान झाली आहे. त्यामुळे सर्व शेतकर्यांना शुभेच्छा देऊया.

पूर्वी मृग नक्षत्राचा पाऊस धो धो बरसून जायचा. असे एक-दोन पाऊस पडले की, पेरणीची घाई सुरू व्हायची. मृग नक्षत्र संपता संपता पेरण्या आटोपलेल्या असायच्या आणि आर्द्रा नक्षत्राच्या उन्हाने वाढीस लागलेल्या पिकाला सूर्यप्रकाशाचे अन्न मिळायचे. आता सारे वेळापत्रकच विस्कटून गेले आहे. शेतकर्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे. हेही नक्षत्र कोरडे गेले की, शेतकर्यांचे विस्थापन सुरू होईल. पावसाचे विस्कटलेले वेळापत्रके सुधारणे आपल्या हातात नाही. त्याचा अंदाज घेऊन आपल्या शेतीचे वेळापत्रक बदलणे मात्र आपल्या हातात आहे. पाऊस त्याच्या लहरीने पडणार आहे, आपण त्याच्या लहरीचा अभ्यास करून आपली शेती अधिकात अधिक कशी पिकवता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या शेतीचे वेळापत्रक आणि तंत्रज्ञान पावसानुसार ठरत असते. सुदैवाने माणसाला असे बदल करण्याइतकी बौद्धिक क्षमता प्राप्त झालेली आहे. तिचा वापर करून आपण आपली शेती बदलत्या हवामानात सुद्धा कशी छान करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कमी पाऊस पडला म्हणजे दुष्काळच पडावा असे काही नाही. परंतु पावसाचे आणि शेतीचे तंत्रज्ञान ज्ञात नसलेले लोक पावसाचा आणि दुष्काळाचा असा संबंध जोडत असतात. शेतीची विभागणी खरीप आणि रबी अशा दोन हंगामात न करता मध्य हंगाम नावाचा एक प्रकार करावा लागेल. पाऊस उशिरा पडला तरीही ऑगष्ट महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पेरूनही उत्तम पीक येईल असे पीक घेतले पाहिजे. कारण आता दरवषींच उशीरा पाऊस पडायला लागला आहे. आपण कमी पाऊस पडला की दुष्काळ पडला असे म्हणतो. पण भरपूर पाऊस पडला तरीही आपण तसेच म्हणतो केवळ कोरडा दुष्काळ ऐवजी ओला दुष्काळ म्हणतो.

एकंदरीत नेहमी दुष्काळच. म्हणजे त्यांच्या मनात दुष्काळ असतो. जे लोक पावसाच्या लहरीनुसार शेतीचे तंत्रज्ञान बदलतात त्यांना कधीच दुष्काळ जाणवत नाही. म्हणूनच आता पाऊस कितीही लांबला तरी यातूनही आपण काय करू शकतो याचा आणि याचाच विचार केला पाहिजे. इस्रायलमध्ये आपल्यापेक्षा किती तरी कमी पाऊस पडतो. पण तिथे कधीच दुष्काळ नाही. त्यांना ते शक्य होते आणि आपल्यालाच का होत नाही? याचे कारण असे की आपल्या मनाने दुष्काळाशी सामना करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पाऊस कितीही पडो मात्र आपली शेती छान पिकेलच असा निर्धार आपण केला तर दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे. पाऊस कमी पडो की जास्त पडो, पडलेल्या पावसाचा थेंब अन् थेंब आपण जमिनीत जिरवला तर दुष्काळाचे काही कारणच नाही. फक्त पाणी जिरविण्याची दक्षता मात्र घ्यायची आहे. एवढे माहीत असूनही दुष्काळ का पडतो? याचे एक कारण म्हणजे पाणी जिरविण्याचे हे शाश्वत स्वरुपाचे काम आपण करायचे नसून सरकार येऊन करणार आहे, असा आपला समज आहे. तो समज दूर झाला पाहिजे.
comments